तंत्रज्ञान विश्व

फोनचा ‘स्मार्ट’ वापर

अनेकदा आपल्याला संगणकावर काम करत असताना मोबाइलकडे लक्ष देता येत नाही.







नीरज पंडित

आपल्या फोनचा स्मार्ट वापर कसा करू शकतो.

                      आपल्या फोनचा वापर आपण संवादासोबतच मनोरंजनासाठीही करू लागलो आहोत. इतकेच नव्हे तर आता बँकांच्या व्यवहारासाठी किंवा अगदी दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठीही करू लागलो आहोत. पण या फोनमध्ये इतके काही दडले आहे की इतका सर्व वापर करूनही आपण फोनचा केवळ २० टक्केच वापर करत असल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. पाहुयात आपण आपल्या फोनचा स्मार्ट वापर कसा करू शकतो.
संगणक नियंत्रण
                    अनेकदा आपल्याला संगणकावर काम करत असताना मोबाइलकडे लक्ष देता येत नाही. यामुळे त्या कालावधीत अनेक संदेश वाचणे किंवा अनेकांशी संवाद साधणे राहून जाते. यावर पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या मोबाइलने संगणकावर नियंत्रण मिळवू शकता. यासाठी तुम्हाला ‘विन रिमोट कंट्रोल’ हे अ‍ॅप मदत करू शकते. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही विंडोज ऑपरेटिंग प्रणाली असलेला तुमचा संगणक ब्लू-टुथ किंवा वाय-फायच्या माध्यमातून मोबाइलशी जोडू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या मोबाइलवरून संगणक किंवा लॅपटॉपवरील महत्त्वाचे सॉफ्टवेअर्स वापरू शकता. या अ‍ॅपवर तुमच्या संगणकाचा डेस्कटॉप दिसतो. ज्यामुळे तुम्ही मोबाइलवरून संगणकावरील म्युझिक प्लेअर, मीडिया प्लेअर, व्हीएलसी प्लेअर सुरू करू शकतो. याचबरोबर टास्क मॅनेजरच्या माध्यमातून संगणकाचा सीपीयू किती काम करत आहे याचा आलेखही तुम्ही मोबाइलवर पाहू शकता. अ‍ॅपमध्ये देण्यात आलेल्या फाइल मॅनेजरच्या सुविधेमुळे तुम्ही मोबाइलमधून संगणकावरील छायाचित्रे, व्हिडीओज, इमेज एडिटर आदी पर्यायही वापरू शकता. याद्वारे तुम्ही अ‍ॅड्रेसबार झूम करणे, बंद करणे आदी गोष्टी तुम्ही अ‍ॅपद्वारे नियंत्रित करू शकता. हे अ‍ॅप मोफत आणि पेड अशा दोन स्वरूपात गुगल प्लेवर उपलब्ध आहे.
फोनचा गुगलवर शोध
                अनेकदा आपण आपला फोन कोठे तरी ठेवतो मग तो सापडत नाही आणि शोधाशोध सुरू होते. अशावेळी तुम्ही संगणकावर गुगल सुरू करून ‘फाइंड माय फोन’ असे टाइप केल्यावर तुमचा फोन कोठे आहे हे समजू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये जीमेल सुरू करणे आवश्यक आहे. तसेच संगणकावर सर्च करताना जीमेल सुरू करून मग गुगल सुरू केल्यास फोनचा ठावठिकाणा सापडणे सोपा जातो. तुम्हाला त्याचे लोकेशन कळाले की तुम्ही त्याच्यावरून फोनला रिंग देऊ शकता. इतकेच नव्हे तर फोनमधील सर्व माहिती तुमच्या जीमेल खात्यावर साठवू शकता. जर तुमचा फोन चोरीला गेला असेल तरी तुम्ही हा पर्याय वापरून क्रोमच्या प्रायव्हेट ब्राऊजिंगमध्ये जाऊन तुम्ही लॉगइन करावे व त्यानंतर तुमच्या जीमेलचा पासवर्ड बदलावा. म्हणजे चोरटय़ाने जरी फोन सुरू केला तरी तुमची माहिती त्याच्यापर्यंत पोहचू शकणार नाही. जीमेलच्या द्वारे तुम्ही फोन लॉकही करू शकता.
विंडोज 8 नियंत्रक
                तुमचा विंडोज 8 किंवा त्यापुढील ऑपरेटिंग प्रणाली असलेला संगणक नियंत्रित करण्यासाठी ‘विंडोज 8 कंट्रोलर’ हे अ‍ॅप तुम्ही वापरू शकता. या अ‍ॅपमध्ये वाय-फायच्या साह्याने जोडणी केल्यानंतर तुमच्या मोबाइलच्या स्क्रीनवर विंडोज 8ची होम स्क्रीन येते. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही संगणकावरील किंवा लॅपटॉपवरील सर्व गोष्टींचे नियंत्रण करू शकता. म्हणजे अ‍ॅपच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या फाइल सुरू करणे व एडिट करणे सेव्ह करणे आदी गोष्टी करू शकतो. याद्वारे तुम्ही यू-टय़ुब किंवा गुगलसर्च, फेसबुक किंवा ट्विटरचा वापरही करू शकता. हे अ‍ॅप मोफत आणि पेड अशा दोन स्वरूपात गुगल प्लेवर उपलब्ध आहे.
मित्राच्या फोनवरून तुमच्या फोनचा वापर
                 तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला निघालात आणि तुमचा फोन सोबत आणायला विसरलात. तर दिवसभर फोनशिवाय कसा काढायचा हा प्रश्न आपल्याला पडतो. अनेक महत्त्वाचे संदेश येणार असतात. अशावेळी तुम्ही तुमच्या विश्वासू मित्राच्या फोनमधून तुमच्या फोनचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या मित्राच्या मोबाइलमध्ये पाहुणे वापरकर्ते म्हणून तुमचे जीमेलचे लॉगइन करू शकता. हे लॉगइन केल्यावर तुमच्या फोनचा सर्व तपशील त्या लॉगइनमध्ये दिसू लागतो. म्हणजे तुमचे संदेश, छायाचित्रे आदी गोष्टी तिथे दिसू लागतात. यामुळे तुम्ही तुमच्या फोनपासून लांब राहण्याऐवजी मित्रांच्या फोनमधून तुमच्या फोनचा वापर करू शकता.
ऑटो अनलॉक
                 फोनला सुरक्षा म्हणून आपण पासवर्ड ठेवतो. पण फोन सतत वापरायचा असेल तर दरवेळेस फोन अनलॉक करताना पासवर्ड टाकण्याची प्रक्रिया कंटाळवाणी वाटू लागते. यामुळे तुम्हाला सुरक्षित वाटत असलेल्या ठिकाणी तुमचा फोन आपोआप अनलॉक होऊ शकतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही अ‍ॅपची आवश्यकता नसून ती फोनमध्ये अंतर्गत सुविधा म्हणूनच देण्यात आली आहे. यासाठी तुम्ही मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जा. तेथे स्मार्ट लॉक पर्याय निवडा. तेथे ट्रस्टेड प्लेसेस या पर्यायामध्ये तुम्ही ठिकाणे सेव्ह करून ठेवू शकता. याचबरोबर तुम्ही यामध्ये विश्वासार्ह आवाज आणि विश्वासार्ह उपकरणही सेव्ह करून ठेवू शकता.

पासवर्डची काळजी कशी घेता येईल.
– सिद्धार्थ तापस, रायगड
             आजमितीस जगातील २१ टक्के इंटरनेट वापरकर्ते दहा वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. तर ४७ टक्के वापरकत्रे पाच वर्षांपासून एकच पासवर्ड वापरत आहेत. २०१४ मध्ये बहुतांश लोकांचा पासवर्ड हे १२३४५६, पासवर्ड असे सोपे होते.
यामुळे हॅकिंग प्रकार या काळात जास्त वाढले होते. तर बहुतांश लोक विविध ऑनलाइन लॉगइनसाठी एकच पासवर्ड वापरतात. यामुळे अनेकदा एक खाते हॅक झाले की त्या व्यक्तीची इतर खाती हॅक करणेही सोपी जातात. यामुळे प्रत्येक खात्याचा पासवर्ड हा वेगळा असणे केव्हाही उपयुक्त ठरते. याचबरोबर पासवर्ड ठेवताना जुना आधी दिलेल्या पासवर्डचा वापर करूच नये.
तसेच आपल्या नावातील आद्याक्षरे किंवा जन्म तारखेचा उल्लेख त्यात नसावा. सध्या हॅकर्स हे लांबलचक पासवर्डही सहजगत्या हॅक करू लागले आहेत. यामुळे याबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. या हल्लांना ते डिक्शनरी अटॅक्स असे म्हणतात. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात केली जाते. याचबरोबर की लाँगर अटॅक केला जातो. ज्यात आपल्या उपकरणामध्ये मालवेअर जातो. असे झाल्यावर वापरकर्त्यांच्या नकळत पासवर्ड हॅकपर्यंत जातो. यासाठी तुम्ही पासवर्ड व्यवस्थापन प्रणालीचा वापर करून विविध खात्यांसाठी विविध पासवर्डचे व्यवस्थापन करू शकता. सध्या गुगलने क्रोम या ब्राऊझरमध्ये ऑटोफिलचा पर्याय आणला आहे. हा पर्याय अँटिव्हायरसने सुरक्षित उपकरणामध्ये वापरू शकतो. यामुळे मोठे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार पासवर्ड म्हणून मोठय़ा म्हणी किंवा वाक्प्रचारांचा वापर करणे केव्हाही योग्य ठरते.

     मोबाईल मेमोरी
           मोबाइलमध्ये आठ जीबीअंतर्गत साठवणूक क्षमता आहे. शिवाय मी १६ जीबीचे कार्डही वापरत आहे. असे असतानाही मला सतत मेमरी संपली असे सांगितले जाते. जर मला माहिती साठवायची असेल तर इतर कोणता पर्याय आहे का?
              मोबाइलफोन असो किंवा संगणक आपल्याकडील माहितीसाठा इतका प्रचंड वाढू लागला आहे. यामुळेच यामुळे साठवणुकीसाठी क्लाऊडचा पर्याय समोर आला. या क्लाउड तंत्रज्ञानामुळेच आपण आपल्या विविध उपकरणांमधील माहिती आपल्या हातात असलेल्या उपकरणातही पाहू शकतो तसेच माहिती साठवण्यासाठीही मुबलक जागा मिळवू शकतो. यासाठी ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह, वन ड्राइव्ह, बॉक्स असे विविध अ‍ॅप्स अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहे. या अ‍ॅपवर लॉगइन करून तुम्ही तुमची माहिती साठवून ठेवू शकता.

विजेटचं विश्व

तंत्रज्ञानाचं विश्व म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. या गुहेत एकापेक्षा एक अद्भुत खजिना आहे.





स्मार्टफोन म्हटलं जातं त्याच्या स्मार्टनेसचा निदान पुरेपूर वापर तरी झाला पाहिजे की नाही. उदाहरणार्थ, मोबाइलचा मोठा स्क्रीन.

            तंत्रज्ञानाचं विश्व म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. या गुहेत एकापेक्षा एक अद्भुत खजिना आहे. आपल्या हातातला स्मार्टफोन हा त्यातलाच एक. पण हे प्रकरणसुद्धा अजबच आहे. मात्र ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या एका संशोधनानुसार सर्वसामान्य वापरकर्ता स्मार्टफोनमधल्या एकूण फिचर्सपैकी फक्त ४० टक्के सुविधा वापरतो. याचाच अर्थ ज्या यंत्रासाठी आपण १०० टक्के पैसे मोजतो त्याचा आपण फक्त ४० टक्के वापर करतो. अशी अनेक फिचर्स असतात जी कधीच वापरली जात नाहीत. अर्थात पैसे वसूल करायचे म्हणून फोनची पिळवणूक करावी अशातला भाग नाही. पण ज्याला स्मार्टफोन म्हटलं जातं त्याच्या स्मार्टनेसचा निदान पुरेपूर वापर तरी झाला पाहिजे की नाही. उदाहरणार्थ, मोबाइलचा मोठा स्क्रीन.
          व्हिडीओ आणि सिनेमे पाहण्यापलीकडे या मोठय़ा स्क्रीनचा काही उपयोग आहे असं अनेकांना वाटत नाही. खिशातलं थिएटर एवढाच काय तो साडेपाच-सहा इंचाच्या स्क्रीनचा वापर. पण मग जेव्हा व्हिडीओ, सिनेमे सुरू नसताना या स्क्रीनचा पुरेपूर वापर कसा करायचा. याचा एक उत्तम आणि अत्यंत उपयुक्त वापर आहे. त्यासाठी स्मार्टफोनमध्ये फिचरही आहे आणि त्याचं नाव म्हणजे – विजेट्स. मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचा जन्म झाला त्या दिवसापासूनच विजेट्स अस्तित्वात आहेत. पण ज्या वेगाने ऑपरेटिंग सिस्टम्स किंवा अ‍ॅप्स लोकप्रिय झाले त्या तुलनेत विजेट्स मात्र उपेक्षित राहिली. उलटपक्षी तंत्रज्ञान वापरकर्त्यांनी कधी या विजेट्सकडे गांभीर्याने पाहिलंच नाही. तंत्रस्वामी किंवा गॅजेटकिडय़ांपर्यंतच हे विजेट्स मर्यादित राहिले.
मुळात विजेट म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम किंवा अ‍ॅप्लिकेशनचा एक छोटासा भाग. रॅमचा कमीत कमी वापर करून अधिकाधिक उद्देश साध्य करणं हा विजेट्सचा मुख्य हेतू. उदाहरणार्थ, घरात तेलाची किंवा लोणच्याची मोठी बरणी असते. त्यातलं रोजच्या वापरासाठी लागणारं आठवडय़ाभराचं तेल किंवा लोणचं दुसऱ्या एका छोटय़ा भांडय़ात काढून ठेवलं जातं. आणि ते भांडं पटकन हाताला लागेल अशा ठिकाणी ठेवलेलं असतं. विजेट म्हणजे हे छोटं भांडं. कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टमसाठी, अ‍ॅपसाठी आणि मॉडेलच्या स्मार्टफोनसाठी हे छोटं भांडं अत्यंत उपयुक्त आहे. बहुतांशवेळा ही विजेट्स डाऊनलोड करावी लागत नाहीत. कुठल्याही कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये ती इनबिल्ट म्हणजे आधीपासूनच असतात. फक्त ती आपल्याला शोधावी लागतात.
शोधायची कशी
सामान्यत: डेस्कटॉपवर म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनवर दोन-तीन सेकंद बोट ठेवलं की विजेट्सचा पर्याय आपणहून येतो. आपल्या गरजेनुसार मग ही विजेट्स निवडता येतात. विजेट्सचा फायदा असा की छोटय़ाछोटय़ा गोष्टींसाठी प्रत्येकवेळा संपूर्ण अ‍ॅप सुरू करायची गरज नसते. हे विजेट तुम्हाला सतत अपडेटेड ठेवतं. उदाहरणार्थ, तापमान आणि घडय़ाळ हे सगळ्यांच्याच स्मार्टफोन्सच्या स्क्रीनवर दिसत असतं. हेसुद्धा एक विजेटच आहे. तापमानाविषयी अधिक जाणून घ्यायचं असतं तेव्हा मग त्यावर क्लिक किंवा टॅप केलं जातं आणि अधिक खोलात शिरलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेट्समुळे बॅटरी वाचते. अर्थात स्क्रीनलाइटपेक्षा अधिक बॅटरी विजेट्ससाठी वापरली जाते. पण अ‍ॅपपेक्षा कमीच वापर होतो. ऑल इन वन विजेट्सचा वापर केलात तर फारच फायदेशीर ठरू शकतं. विजेट्स वापरणं म्हणजे ज्या भल्यामोठय़ा स्क्रीनसाठी पैसे मोजलेत ते वसूल करणं.
काही उपयुक्त विजेट्स
डॅशक्लॉक – हे एक लोकप्रिय विजेट आहे. एकाच वेळी स्थानिक वेळ- तापमान, मिस कॉल्स, न वाचलेले मेसेजेस, कॅलेंडर, बॅटरी मीटर, म्युझिक कंट्रोल, डेटा युसेज, ईमेल्ससारख्या अनेक फिचर्सचे नोटिफिकेशन आणि माहिती दिली जाते. अ‍ॅप स्टोअरमध्ये हे विजेट सहज उपलब्ध आहे.
सिंपल आरएसएस विजेट – बातम्या आणि लेख वाचणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त विजेट आहे. मोठय़ा टायपात, स्पष्टपणे मथळा आणि थोडक्यात बातमी अशा स्क्रीनवर दिली जाते.
याशिवाय गुगल कीप, अल्टिमेट कस्टम विजेट, युनिफाइड रिमोट, स्लाइडर विजेटसारखे पर्यायही उपलब्ध आहेत. जर का ही विजेट्स स्क्रीनवर आणल्यानंतर मोबाइल मंदावल्यासारखा वाटत असेल तर चिंता करू नका. सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप्सवर क्लिक करा. ऑल रनिंग अ‍ॅपमध्ये जाऊन शो कॅशे प्रोसेसेस निवडा. आणि एकावेळी एकेक अ‍ॅप बंद करा. याने मोबाइलची कार्यक्षमता नक्कीच वाढेल.
पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

No comments:

Post a Comment

‘व्हॉट्सअ‍ॅप’ नवे काय?

‘व्हॉट्सअ‍ॅप’ नवे काय?                  सकाळी उठल्याक्षणापासून रात्री डोळ्याला डोळा लागेपर्यंत आपले डोळे ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर लागलेले असत...